नंदकिशोर पाटील छत्रपती संभाजीनगर: लाडक्या बहिणींनी दिलेली साथ, भाजपचे मायक्रोप्लॅनिंग आणि ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे झालेले ध्रुवीकरण यामुळे मराठवाड्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीची धूळधाळ उडवली. ४६ मतदारसंघापैकी तब्बल ४१ जागा मिळवत मराठवाड्याने राज्यात महायुतीची सत्ता आणण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लावला आहे. लोकसभेला महायुतीच्या विरोधात चाललेला जरांगे फॅक्टरही यावेळी पूर्णपणे निष्प्रभ झाल्याचे दिसत आहे.
मराठवाड्यात महाविकास आघाडी महायुतीला जोरदार लढत देईल, अशी चर्चा होती. मात्र मतदारांनी महाविकास आघाडीला पूर्णपणे नाकारले आहे. महायुतीमध्ये २० जागा लढविणाऱ्या भाजपने १९ जागा मिळवत आपला प्रभाव सिध्द केला आहे. शिंदेसेनेने १६ जागा लढवत १३ जागांवर विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ९ जागा लढवत अनपेक्षितपणे ८ जागा खेचून आणल्या आहेत. महायुतीचे धनंजय मुंडे, अब्दुल सत्तार, अतुल सावे, तानाजी सावंत आणि संजय बनसोडे हे पाच मंत्री विजयी झाले. यातच धनंजय मुंडे यांनी सुमारे सव्वा लाखांच्या फरकाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिध्द केले आहे. शरद पवार यांनी परळीत सभा घेऊन गुंडगिरी संपविण्याचे आवाहन करुनही मुंडे यांनी सुमारे सव्वा लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. एमआयएमचे इम्तियाज जलील हे विधानसभेतही पराभूत झाले.
पत्नीची पतीवर मात
कन्नड मतदारसंघात शिंदेसेनेच्या उमेदवार संजना जाधव यांनी त्यांचे पती अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर मात केली. हर्षवर्धन जाधव हे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. संजना या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत.
पाच मुद्द्यांत विश्लेषण
- लाडकी बहीण : योजनेचा महायुतीमधील तिन्ही पक्षांनी केलेला जोरदार प्रचार
- भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ या घोषणांमुळे झालेल्या ध्रुवीकरणाचा महायुतीला मोठा लाभ झाल्याचे दिसत आहे.
- शरद पवारांचा प्रभाव नाही : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोठा प्रभाव राहील असे चित्र असताना पक्षाला मोठे यश मिळाले नाही. जालना, बीडमध्ये पवारांना प्रभाव पाडता आला नाही.
- लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरने महायुतीला मोठा दणका दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर निष्प्रभ झाल्याचे दिसते.
- भाजपचे यश : यंदाही भाजपचा स्ट्राईक रेट चांगला राहिला.