दीपक भातुसेमुंबई - महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ, बंडखोरी तसेच काही मतदारसंघात अधिकृत उमेदवाराविरोधात मविआतील पक्षाने दिलेले उमेदवार यामुळे काही जागांवर मविआला पराभवाचा फटका बसला आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघावरून तर मविआतील मतभेद टोकाला पोहोचले. येथे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचा उघडपणे प्रचार केल्याने उद्धवसेनेत नाराजी आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे बाबा मिस्त्री आणि धर्मराज काडादी हे दोन बंडखोर उमेदवार उभे होते. मिस्त्री यांनी २६,७०६ मते घेतली, तर काडादी यांना १८,७४७ मते पडली. पराभूत झालेले उद्धवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांना ३९,८०५ मते मिळाली. भाजपच्या सुभाष देशमुखांचा येथे ७७,१२७ मतांनी विजय झाला. दोन बंडखोर आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही देशमुख यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहे.
नांदेड उत्तर मतदारसंघात काँग्रेस आणि उद्धवसेनेचे उमेदवार उभे होते. काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार गफुर यांनी ७९,६८२ मते घेतली, तर उद्धवसेनेच्या संगीता पाटील यांना २२,७०६ मते मिळाली. येथे शिंदेसेनेचे बालाजी कल्याणकर ३५०२ मतांनी विजयी झाले. पंढरपूरमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटाचे उमेदवार समोरासमोर उभे होते. काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांना १ लाख १६ हजार ७३३ मते मिळाली, तर शरद पवार गटाचे अनिल सावंत यांना १० हजार २१७ मते मिळाली. येथे भाजपचे समाधान औताडे ८ हजार ४३० मतांनी विजयी झाले.
कुठे काय झाले?
उरण : शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांचा ६,५१२ मतांनी पराभव झाला. उद्धवसेनेचे मनोहर भोईर यांना येथे ६९,८९३ मते मिळाली. हिंगोली : उद्धवसेनेच्या रूपाली पाटील यांचा १०,९२६ मतांनी पराभव झाला. येथे काँग्रेसचे बंडखोर बाबूराव पाटील यांना २२,२६७ मते मिळाली. परतूर : उद्धवसेनेचे आसाराम बोराडे यांचा ४,७४० मतांनी पराभव. येथे काँग्रेस बंडखोर सुरेश जेथलिया यांना ५३,९२१ मते.