किरण अग्रवालजळगाव - उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे जिल्ह्यात महायुतीला ‘शत-प्रतिशत’ जागा देतानाच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात उद्धवसेनेला साफ नाकारले गेल्याने विभागात ‘महायुती’ने लक्षणीय वर्चस्व स्थापित केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर अशा दोनच जागा काँग्रेसला तर कर्जत जामखेडची एकमात्र जागा शरद पवार गटाला लाभली आहे.
यावेळचा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये निकराचा सामना झाला. त्यात मोठ्या प्रमाणातील बंडखोर व अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती व्यक्त होत होती; पण समीर भुजबळ, हिना गावित व ए.टी. पाटील अशा तिघा माजी खासदारांसह सर्वच बंडखोरांची सद्दी मतदारांनी संपविली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पहावा लागला असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर व धुळे ग्रामीणची जागाही काँग्रेसच्या हातून गेल्याने जळगाव, धुळे व नाशिक हे तीन जिल्हे काँग्रेसमुक्त झाले आहेत.
‘एमआयएम’ने गेल्यावेळी मालेगाव मध्यसह धुळे शहर मतदारसंघातील जागा काबीज केली होती; पण यंदा ‘एक है तो सेफ है’च्या नाऱ्यामुळे धुळे शहराची जागा भाजपने विक्रमी मताधिक्याने खेचून घेतली आहे. उद्धवसेनेला अपयश आले असताना शिंदेसेनेने अन्य जागा राखताना धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्येही एक-एक जागा मिळवून खाते उघडले आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, गिरीश महाजन यांना ‘जरांगे फॅक्टर’चा कथित अडथळा न होता विकासावर मतदारांनी मोहोर उमटविली आहे.
पाच मुद्द्यांत विश्लेषण
महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांची एकसंधता व लाडक्या बहिणींचे आशीर्वाद कामी आले.लोकसभेसाठीच्या राज्यातील निकालापासून धडा घेऊन भाजपने केलेले ‘मायक्रो प्लॅनिंग’ उपयोगी पडले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकजिनसीपणे प्रचारात न दिसल्याचा फटका.कांद्याचा प्रश्न मिटला; पण कापूस, सोयाबीन, दूध दराच्या मुद्द्यावर आघाडीला रान पेटवता आले नाही.विभागात जाहीर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महाआघाडीला ‘टेम्पो’ राखता आला नाही.