दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी १,३८,६२२ मतं मिळवून तिसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांचा दारुण पराभव केला. चारोस्कर यांना ९४,२१९ मतं मिळाली. यानंतर आता नरहरी झिरवाळ यांनी "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला आहे… आता दुसरं पद दिलं तर बरं होईल" अशी इच्छा व्यक्त केली आहे.
"निकाल चांगला होता. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी, दादांनी, मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातून कामं करण्यात आली. त्यामुळे लोकांनी मला खांद्यावर घेतल्यासारखं वाटलं. मला वाटतं सभागृहाचं मी आता सर्व अनुभवलं आहे... दुसरीकडे कुठेतरी पद दिलं तर बरं होईल. तिकडचाही अनुभव येईल. तर बघा कसं होतंय... आपल्यावतीने नेते मंडळींना विनंती करा" असं माध्यमांना प्रतिक्रिया देताना नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
यावेळी मतदारसंघात विक्रमी ७५ टक्के अशी मतदानाची नोंद झाली. त्यात महिलांचाही टक्का वाढला होता. वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, यांची तालुकाभरात चर्चा होती. मतदारसंघातून १३ उमेदवार उभे राहिलेले होते. परंतु खरी लढत ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिरवाळ व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्य चारोस्कर यांच्यात झाली. यात पहिल्या फेरीपासून झिरवाळ यांनी घेतलेली आघाडी ही शेवटपर्यंत टिकवून ठेवली. अखेर झिरवाळ ४४,४०३ इतक्या मताधिक्याने विजयी झाले.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही झिरवाळ विजयी झाले होते. मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे २०१९ मध्येदेखील शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा त्यांना संधी दिली होती. त्यांना १ लाख २४ हजार ५२० मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे भास्कर गावित यांचा पराभव केला होता.