अमळनेर (जि. जळगाव) - भंडारा जिल्ह्यातून इगतपुरी जाण्याऐवजी एक पोस्टल मतपत्रिका भुसावळला आली अन् प्रशासनाचा गोंधळ उडाला. एक मत का असेना पण त्याचे मूल्य आहे. आयोगाच्या निर्देशानुसार ती एक मतपत्रिका महिला अधिकारी व सहकाऱ्यांनी रात्रभर प्रवास करून मतमोजणीपूर्वी संबंधित मतदारसंघात पोहोचवली.
२२ नोव्हेंबरच्या रात्री १० वाजता, जळगाव जिल्हा पोस्टल मतपत्रिका केंद्राला भंडारा येथून १२७-इगतपुरी मतदारसंघासाठीची पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाली. १२७- इगतपुरी विधानसभा मतदारसंघासाठीची पोस्टल मतपत्रिका जळगावमधील १२ - भुसावळ मतदारसंघातील मतपत्रिकांमध्ये चुकून आढळून आली होती. मतपत्रिका इगतपुरीतील मतमोजणी केंद्रावर पोहोचवण्याचे काम पोस्टल बॅलेट अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या जयश्री माळी यांना देण्यात आले. माळी यांना एक स्वतंत्र वाहन, एक पोलिस आणि २५० किलोमीटर प्रवासासाठी सरकारी ड्रायव्हर देण्यात आला. जयश्री माळी आणि सहकारी रात्रभर प्रवास करत सकाळी ८ वाजेपूर्वी नाशिकच्या मतमोजणी केंद्रावर पोहोचले आणि तेथील अधिकाऱ्याकडे मतपत्रिका सुपूर्द केली.