हितेन नाईकपालघर : पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेने विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना तिकीट न देता माजी खासदार राजेंद्र गावित यांना मैदानात उतरवल्यानंतर घडलेले नाराजीनाट्य सर्वांनी पाहिले होते; मात्र राजेंद्र गावित यांनी पूर्वी आमदार, मंत्री आणि खासदार म्हणून केलेले काम, तसेच जिल्ह्यामध्ये त्यांचा असलेला जनसंपर्क फायदेशीर ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावित यांना मैदानात उतरवण्याची खेळी अखेर यशस्वी ठरली आहे.
पालघर विधानसभेत महायुतीकडून शिंदेसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित आणि महाविकास आघाडीतील उद्धवसेनेचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्यात लढत झाली. या लढतीत गावित यांनी ४० हजार ३३७ मताधिक्याने विजय मिळवला. जिल्ह्यात वाढवण बंदर, टेक्स्टाइल प्रकल्प, उपरा उमेदवार, अशा मुद्द्यांवर गावित यांना कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.
विजयाची कारणे
१ राजेंद्र गावित हे पालघर जिल्ह्यात गेली काही वर्षे सतत कार्यरत असल्याने लोकांशी चांगला जनसंपर्क होता, त्याचा त्यांना लाभ झाला. २ उमेदवारीवरून झालेल्या नाट्यामुळे प्रचारात सुरुवातीच्या नाराजीनंतर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. ३ राजेंद्र गावितांच्या तुलनेत उद्धवसेनेचा उमेदवार जयेंद्र दुबळा हे काहीसे कमजोर ठरले. ४ विरोधकांनी वाढवण बंदर, मुरबे बंदराविरोधाचा प्रचार केला होता; मात्र पालघरच्या जनतेने त्याला प्रतिसाद दिला नाही. ५ राजेंद्र गावित यांचा राजकारणातील अनेक वर्षांचा अनुभव कामी आला.
पराभवाची कारणे
१ पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेना फुटीनंतर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेसेनेत दाखल झाले होते. २ नागरिकांचा वाढवण बंदर, मुरबे बंदर, टेक्स्टाईल पार्क, आदींना विरोध आहे. त्याचे भांडवल केले, मात्र त्याला जनतेने फारसे महत्त्व दिले नाही. ३ लाडक्या बहिणींबाबतची सरकारची योजना महायुतीला फायदेशीर ठरली. त्याचा साहजिकच फटका उद्धवसेनेच्या उमेदवाराला बसला.४ उद्धवसेनेचे जयेंद्र दुबळा हे राजेंद्र गावितांच्या तुलनेत कसलेले नसल्याने त्याचा परिणाम झाला. ५ जनतेने उद्धवसेनेऐवजी शिंदेसेनेला पसंती दिली.