मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यात महायुतीने जबरदस्त कामगिरी केली आहे. महायुतीत भाजपानं १३२, शिवसेनेने ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत. या निकालात उद्धव ठाकरे यांच्या गटाला केवळ २० जागांवर समाधान मानावं लागले आहे. या २० पैकी बहुतांश जागा मुंबईतल्या आहेत. त्यात मनसे आणि शिवसेनेतील असमन्वयामुळेही उद्धव ठाकरेंच्या काही उमेदवारांनी निसटता विजय मिळवला. त्याशिवाय महायुतीच्या लाटेत राज ठाकरेंच्यामनसेलाही जबर फटका बसला आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाने एकूण २० पैकी मुंबईतल्या विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कलिना, वांद्रे पूर्व, माहीम, वरळी, शिवडी आणि भायखळा या १० जागांचा समावेश आहे. यातील माहीम मतदारसंघात अवघ्या १३१६ मताधिक्याने महेश सावंत विजयी झाले आहेत. तर वरळीतील आदित्य ठाकरे यांचेही मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले आहे. गेल्यावेळी ६७ हजारांचे मताधिक्य घेणारे आदित्य ठाकरे यंदाच्या निवडणुकीत ८८०१ मताधिक्याने विजयी झाले आहेत. वर्सोवा येथील ठाकरेंचे उमेदवार १६०० मतांनी विजयी झाले असून तिथे भाजपा उमेदवाराचा पराभव झाला आहे. जोगेश्वरीत अनंत नर हे १५४१ मतांनी विजयी झाले आहेत.
माहीम मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याठिकाणी शिंदेसेनेकडून सदा सरवणकर हे उमेदवार होते. लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी होतील अशी शक्यता होती. परंतु राज ठाकरेंनी स्वबळावर उमेदवार निवडणुकीत उतरवले. त्यात अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्याआधी राज ठाकरेंनी कुठलाही संवाद महायुतीशी साधला नाही. चर्चेविना उमेदवार दिले अशी नाराजीही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली होती. सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले परंतु तेदेखील अयशस्वी ठरले. जर मनसे आणि महायुतीत योग्यरित्या समन्वय झाला असता तर उद्धव ठाकरे गटाला मुंबईतल्या काही जागा गमवाव्या लागल्या असत्या असं निकालाचे चित्र आहे. या दोघांमधील असमन्वयामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा झाला तसा महायुती आणि राज ठाकरेंनाही फटका बसला.
विक्रोळी मतदारसंघ
सुनील राऊत, उद्धवसेना - ६६०९३ मते (विजयी)सुवर्णा कारंजे, शिंदेसेना - ५०५६७ मतेविश्वजित ढोलम, मनसे - १६८१३ मते
मताधिक्य - १५५२६ मते
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघ
अनंत नर, उद्धवसेना - ७७,०४४ मते (विजयी)मनीषा वायकर, शिंदेसेना - ७५५०३ मतेभालचंद्र अंबुरे, मनसे - १२८०५ मते
मताधिक्य - १५४१ मते
दिंडोशी मतदारसंघ
सुनील प्रभू, उद्धवसेना - ७६४३७ मते (विजयी)संजय निरुपम, शिंदेसेना - ७०२५५ मतेभास्कर परब, मनसे - २०,३०९ मते
मताधिक्य - ६१८२ मते
माहीम मतदारसंघ
महेश सावंत, उद्धवसेना - ५०२१३ मते (विजयी)सदा सरवणकर, शिंदेसेना - ४८८९७ मते अमित राज ठाकरे, मनसे - ३३०६२ मते
मताधिक्य - १३१६ मते
वरळी मतदारसंघ
आदित्य ठाकरे, उद्धवसेना - ६३३२४ मते (विजयी)मिलिंद देवरा, शिंदेसेना - ५४५२३ मतेसंदीप देशपांडे - मनसे, १९३६७ मते
मताधिक्य - ८८०१ मते
...तर अमित ठाकरे विजयी झाले असते
एकनाथ शिंदे यांच्याकडून अमित ठाकरेंना भांडुप पश्चिम मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली होती. मात्र कुठल्याही चर्चेविना राज यांनी अमित ठाकरेंना माहीम मतदारसंघातून उतरवलं. त्यामुळे सदा सरवणकर यांची कोंडी झाली. मनसे शिंदेसेना यांच्यातील असमन्वयाचा फटका राज ठाकरेंना बसला. माहीममधून अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर गेले. भांडुप पश्चिम मतदारसंघात शिंदेंनी अशोक पाटील यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात मनसेकडून शिरीष सावंत रिंगणात होते तर ठाकरेंनी रमेश कोरगावकर या विद्यमान आमदाराला तिकिट दिले. याठिकाणी शिंदेसेनेचे अशोक पाटील हे ६७६४ मतांनी विजयी झाले. तर मनसे उमेदवार सावंत हे २३ हजार ३३५ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. जर अमित ठाकरे हे भांडुप पश्चिममधून उभे राहिले असते तर महायुतीने त्यांना पाठिंबा दिला असता. त्यामुळे इथं अमित ठाकरे निवडून येण्याची संधी होती. मात्र ती राज ठाकरेंनी गमावली.
दरम्यान, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील असमन्वयाचा फटका मनसेच्या एकमेव आमदारालाही बसला. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील यांच्याविरोधात शिंदेंनी राजेश मोरे यांना उमेदवारी दिली. तिथे ठाकरे गटाकडून सुभाष भोईर रिंगणात होते. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत झाली. या लढतीत मनसेचे राजू पाटील पराभूत झाले. तर शिंदेंनी उभे केलेले राजेश मोरे हे भरघोस मतांनी विजयी झाले.