Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "नियम फक्त विरोधी पक्षांनाच, सत्ताधाऱ्यांना मोकळं ..." बॅग तपासणीवरुन अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 06:04 PM2024-11-11T18:04:15+5:302024-11-11T18:05:30+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज वणी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे जाहीर सभा होती. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तर दुसरीकडे खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगचीही तपासणी करण्यात आल्याचे समोर आले. यावरुन आता अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन 'नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही, अशी टीका केली.
नेते म्हणजे 'गुप्त मित्र' अन् कार्यकर्ते 'उघड शत्रू';एकमेकांशी भिडणाऱ्यांना मिळतोय सल्ला
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत निवडणूक अधिकारी बॅग तपासत असल्याचे दिसत आहे. कोल्हे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आज पुन्हा एकदा बॅग तपासली गेली, विधानसभा निवडणुकीदरम्यान दुसऱ्यांदा तपासणी झाली. आजच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांचीही तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे !, असं या पोस्टमध्ये लिहिले आहे.
बॅगांची तपासणी; ठाकरे संतापले
हेलिपॉडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांना तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा आठ, दहा जण माझ्या स्वागतासाठी आले होते. म्हटलं काय करायचं आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे, मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडीओ काढला आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.