Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नेत्यांनी बंडखोरी केली आहे. भिवंडी पूर्व मध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, आज त्यांनी मेळावा घेऊन निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता सपाचे नेते रईस शेख यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.
आज माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत बोलताना माजी मंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. रुपेश म्हात्रे म्हणाले, पक्षात फूट झाली त्यानंतर आम्ही पक्षाची एकजूट करण्यासाठी मी सर्व काही केले आहे. लोकसभेत आम्ही ताकद वाढवली. आमच्या पक्षाने ठरवला तो खासदार आम्ही निवडून दिला, लोकसभेत आमच्यावर अन्याय झाला, आता विधानसभेत जागावाटपाटतही आमच्यावर अन्याय झाला. आता जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज मेळाव्याचे आयोजन केले होते, असंही म्हात्रे म्हणाले.
"२०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाला निवडून यावं म्हणून कपील पाटील यांचं काम आम्हा सर्वांना करावं लागलं. आता देखील तिच परिस्थिती आहे. बांद्रा किंवा वरळीमध्ये मदत व्हावी म्हणून या ठिकाणी मुस्लिम उमेदवारी किंवा समाजवादीचा उमेदवार देण्यात यावा, अशापद्धतीने कुठेतरी त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येकवेळी बळी देण्याचं काम होत आहे. ते होऊ नये हीच गोष्ट आम्हाला सांगायचं आहे, भिवंडीवर नेहमी अन्याय केला जात आहे. हेच यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केले आहे, आता उद्धव ठाकरेही करत आहेत, असा आरोप माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी केला.
'अशा पद्धतीने जर भिवंडीला पाहत असतील तर भिवंडीकर आपली ताकद दाखवतील. आम्ही कुठल्याही पक्षाने किंवा नेत्याने आम्हाल गृहीत धरु नये, असंही म्हात्रे म्हणाले.