Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते. दरम्यान, काल रात्री खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. ही रोकड पाच कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ही रोकड असल्याचा आरोप केला आहे, या आरोपाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले.
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरच संशय व्यक्त केला असून त्यांनी राऊतांची या प्रकरणी चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे.अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अकोट विधानसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काल त्यांची बैठक झाली असून आज त्यांना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
आज मुंबईत टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला. यावेळी अमोल मिटकरी म्हणाले, खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापडलेल्या पैशाची सविस्तर चौकशी केली पाहिजे. ते कोणाचे पैसे आहेत याची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांनीच ते पैसे आम्हाला बदणाम करायला पाठवले नसतील ना? अशी आम्हाला शंका येत आहे, असंही मिटकरी म्हणाले. तो पैसा तिकडेच कसा गेला आणि हे राऊत साहेबांनाच कसं माहित, आता आम्हाला शंका येत आहे, त्यामुळे संजय राऊत यांची या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली.
अजित पवार कार्यकर्त्यांना संधी देतात
घराणेशाहीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, मी घराणेशाहीत जन्माला आलेलो नाही, घराणेशाहीला मी विरोधच करतो. सर्वसामान्य कार्यकर्ते पक्षासाठी काम करत असतात, त्यांना संधी दिली पाहिजे. अजितदादा याला अपवाद आहेत. त्यांनी मला, नायकवडी यांना संधी दिली. अजित पवार सामान्य कार्यकर्त्यांना संधी देतात, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे, असंही मिटकरी म्हणाले.