Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. रिक्त महासंचालक पदासाठी फणसळकर यांच्यापाठोपाठ संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि रितेश कुमार यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती करण्यात आली आहे. IPS संजय वर्मा यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
काही दिवसापासून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी आरोप सुरू होते. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली होती. दरम्यान, काल निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते. बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.
१९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी
आयपीएस संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते एप्रिल २०२८ मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या डीजीपी पदासाठी ते आघाडीवर होते.