Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश असून खासदार शरद पवार यांनी ११ नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार तर तासगाव कवठेमहांकाळमधून रोहित पाटील यांनी मैदानात उतरवले आहे. यामुळे आता या ११ विधानसभा मतदारसंघात मोठी लढत होणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश आहे. यात भाजपामधून आलेल्या समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, बेलापूरचे संदीप नाईक यांचाही समावेश आहे.
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
या ११ नव्या चेहऱ्यांना खासदार शरद पवार यांनी दिली संधी
जामनेर विधानसभा दिलीप खोडपे,मूर्तीजापूर विधानसभा सम्राट डोंगरदिवे, अहेरी विधानसभा भाग्यश्री आत्राम, मुरबाड विधानसभा सुभाष पवार, युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेतून तर कोपरगावमधून संदीप वर्पे, पारनेरमधून राणी लंके, आष्टीमधून मेहबूब शेख, चिपळूनमधून प्रशांत यादव, तासगाव -कवठेमहांकाळमधून रोहित पाटील, हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे अकरा उमेदवार आता विधानसभा निवडणुकीसाठी नवीन असणार आहेत. त्यांच्याविरोधात तगडे उमेदवार असणार आहेत.
या दोन महिलांना दिली संधी
अहेरी विधानसभेतून आग्यश्री आत्राम यांना संधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने नव्या दोन महिलांना विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यांच्याविरोधात त्यांचेच वडील बाबा आत्राम हे निवडूक लढणार आहेत. यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होणार आहे.
पारनेर विधानसभेतून राणी लंके
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पारनेर विधानसभा मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लंके यांचीही ही पहिलीच विधानसभेची निवडणूक असणार आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. खासदार शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवलं आहे. यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू आहे. तर तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्याविरोधात माजी खासदार संजयकाका पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे.