Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. खासदार शरद पवार यांच्या राज्यभर प्रचारसभा सुरू आहेत. आज पवार यांनी वाई येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून खासदार पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तसेच सभेतील एका कार्यकर्त्याने शरद पवार यांना एक चिठ्ठी दिली. ही चिठ्ठी वाचून पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
यावेळी सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, वाई सारख्या भागाने महाराष्ट्राला कतृत्ववान नेते दिले. राष्ट्रवादी पक्ष सतत तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बहुसंख्य लोक आपल्याला सोडून गेले. हे मला काही नवीन नाही, या आधीही अनेक आमदार मला सोडून गेले होते. या आधी मला ५८ मधील ५२ नेते सोडून गेले होते. नंतर निवडणूक आली, मी महाराष्ट्राभर फिरलो आणि ५२ पैकी एकही आमदार निवडून आलेला नाही. आता दुर्देवाने आता तिच परिस्थिती या ठिकाणी होणार आहे, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
यावेळी सभेत बोलताना अचानक एका कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली. या चिठ्ठीत गद्दारांचं काय? असं लिहिलं होतं. यावेळी पवार म्हणाले, गद्दारांना पाडा, पाडा असं स्पष्ट सांगितलं. यावेळी सभेत एक जल्लोष सुरु झाला.
'महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा'
राज्यात दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार राजकीय चढाओढ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री कधी मिळणार याबाबत सातत्याने चर्चा होत असते. राज्य स्थापनेपासून आजतागायत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही, हा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला जातो.शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले, “राज्यात आमच्या सत्ताकाळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे,” असे त्यांनी सांगितले.