Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :बारामती विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठी लढत पाहायला मिळत आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. बारामती मतदारसंघातील काही गावात मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर मतदारांना घड्याळाच्या शिक्क्यांच्या स्लिपचे वाटप आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप आरोप युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी आज काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विरोधी गटावर मतदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे. मतदारांना दिलेल्या चिठ्ठ्यांच्या मागे घड्याळाचा शिक्का असल्याचा आरोप केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याचा आरोपही शर्मिला पवार यांनी केला आहे.
यावेळी बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या, मतदारांकडे चिठ्ठ्या असून त्यावर शिक्के मारून आत सोडले जात आहे. इतर ठिकाणी बूथवर फिरत होते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला धमक्या आल्या. मी संपवतो, तुला खल्लास करतो अशी भाषा इथं सुरू आहे. हवं असेल तर तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासा असंही पवार म्हणाल्या.
या आऱोपांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शर्मिला पवारांचे सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. 'शर्मिला पवार यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. तसं काही झालेलं असेल तिथल्या सीसीटीव्हीमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं असेल, निवडणूक अधिकारी चेक करतील. मी एवढ्या निवडणुका पार पाडल्या, पण कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशी वक्तव्य केलेली नाहीत. माझा कार्यकर्ता असं कधीही वागणार नाही, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले.