Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेनेचे नाव हे बाळासाहेब ठाकरे यांनी कमावलेले आहे त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहायला हवे होते, असं विधान मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. आज सकाळीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्हावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. आता अमित ठाकरे यांनीही याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना शिवसेनेचे चिन्ह आणि नाव यावर भाष्य केले. चिन्ह आणि नावाबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले, हे नाव आणि चिन्ह बाळासाहेब यांचे आहे. ते त्यांचेच रहायला पाहिजे होते असे मला वाटते कारण त्यांनी ते कमावलेले होते. लोकांच्या मतावर कमावले होते, त्याला हात लावायला नको होता. ते ठाकरेंकडे असालया हवे होते. असं कुणाबाबतीत घडले नाही पाहिजे असंही मला वाटते, असेही अमित ठाकरे म्हणाले. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
... तर महायुतीसोबत जाणार
अमित ठाकरे म्हणाले, निवडणुकीनंतर आमचं महायुतीसोबत जुळू शकतं. आम्हाला भाजपासोबत जायला आवडेल. राज ठाकरे आणि भाजपाचे जुने संबंध आहेत. मनसेच्या शंभर जागा येतील, असंही ठाकरे म्हणाले. आता कोणाच्या किती जागा येतील सांगता येत नाही, राजकारणाची सगळी खिचडी झाली आहे. २०१९ ला राजकारणात गोंधळ झाला तेव्हापासून राजकारणाची खिचडी झाली आहे. २०१९ ही त्याची सुरुवात होती, असंही ठाकरे म्हणाले. शिवसेनेची ४० आमदार बाळासाहेबांच्या विचाराने चालत होते, ते आमदार काँग्रेससोबत काम करत होते. त्यांचा हा मोठा निर्णय होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत असा मोठा निर्णय घेतला. पण यात चिन्ह आणि शिवसेनेच्या नावाचा झाले तेल चुकीचे आहे. ते त्यांच्याकडेच रहायला हवे होते, असं स्पष्ट मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले.