Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही, यामुळे आता इंडिया आघाडीत तेढ निर्माण झाल्याचे दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपत आहे, पण महाविकास आघाडी घटक - काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणिराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील जागावाटपावरून मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. दरम्यान, अखिलेश यादव यांची सपाही वेगळ्या आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत दिसत आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षाला 'सबका साथ, सबका विकास'ची सर्वाधिक गरज आहे. शेतकरी आणि कामगार पक्ष आणि सपा सारख्या छोट्या पक्षांनी एकतर्फी उमेदवार जाहीर केल्याबद्दलही राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.
दुसरीकडे, सपा महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू आझमी यांनी शुक्रवारी सांगितले की, माविआ'मध्ये जागावाटपावर एकमत झाले नाही तर सपा २०-२५ जागांवर उमेदवार उभे करेल.
संजय राऊत म्हणाले, हरयाणात काँग्रेसने सर्व जागांवर निवडणूक लढवली, पण सरकार बनवता आले नाही. त्यामुळे त्यांना सर्वांना सोबत घ्यावे लागेल.'सबका साथ, सबका विकास' कोणाला हवा असेल तर तो माविआ आहे. देशाच्या विकासाप्रती त्यांच्या सरकारची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा 'सबका साथ, सबका विकास'वर भर देतात हे विशेष, असंही ते म्हणाले.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ते म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मला जागावाटपावर बोलण्यास सांगितले आहे. मुंबईतील काही जागांसाठी चर्चा सुरू आहे.