Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक आहे. महाराष्ट्रात उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यादरम्यान आज विरारमधील एका हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी प्रतिक्रिया दिली, त्रिवेदी यांनी महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने शेवटचा खोडसाळ प्रयत्न म्हणून बिनबुडाचे आरोप केले. विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय सचिव आहेत आणि पक्षाची अनेक कामे पाहत आहेत. नालासोपारा मतदारसंघातील उमेदवाराने त्यांच्यावर आरोप केला आहे. त्यांना सभेला उपस्थित राहण्यास सांगितले होते, त्यामुळे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रियेबाबत सूचना दिल्या. बिनबुडाचे आरोप करू नका, असा टोलाही सुधांशू त्रिवेदी यांनी लगावला.
मतदानापूर्वी महाविकास घाडीच्या नेत्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. वसई विरारमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. विनोद तावडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.
भाजपा नेते विनोद तावडे यांनी आपल्यावर झालेले आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे.
ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
राजन नाईक यांनी सांगितले की निवडणुकीच्या दिवशी आचारसंहितेच्या दिवसाची माहिती द्यावी. ती माहिती मी दिली. या राड्यानंतर एकत्र पत्रकार परिषद घेऊ आणि प्रश्न विचारतील त्याची उत्तरे देऊ जनता निर्णय घेईल असे आम्ही ठरवले आणि इथे आलो, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे. तसेच हे पैसे माझे नाहीत असा दावाही तावडे यांनी केला आहे.
ज्या पैशांवरून राडा केला ते माझे नाहीतच. ज्या खोल्यांत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो, असे तावडे यांनी म्हटले आहे. याचबरोबर जेवढा त्यांनी दावा केला आहे तेवढे पैसे सापडले नाहीत तर मी ते ठाकुरांकडून वसूल करणार आहे, असेही तावडे यांनी म्हटले आहे.