Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून जागावाटपाची गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती. आता काही जागांवरील लढती ठरल्याचे दिसत आहे. दरम्यान, काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत सात उमेदवारांचा समावेश आहे. इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, अणुशक्ती नगर, वांद्रे पूर्व मधील उमेदवारांची घोषणा केली आहे.
इस्लामपूर विधानसभेतून निशिकांत पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेतून संजयकाका पाटील, अणुशक्ती नगर विधानसभा सना मलिक, वांद्रे पूर्व विधानसभेतून झिशान सिद्दिकी, वडगाव शेरी विधानसभेतून सुनील टिंगरे, शिरुर विधानसभेतून ज्ञानेश्वर कटके, लोहा विधानसभेतून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार गटाने सांगली जिल्ह्यातही आपले उमेदवार दिले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा आणि तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानले जातात. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांना तर इस्लामपूरमधून निशिकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही, त्यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. तर वांद्रे पूर्व मधून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली आहे. सिद्दिकी यांनी आजच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.