Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी गेल्या काही दिवसापासून सुरू आहे, आजपासून प्रचारसभा थंडावणार आहे. याआधीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदारांसाठी खास संदेश दिला आहे. शिवसेनेच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ठाकरे यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, या व्हिडीओत ठाकरे यांनी मतदारांना साद घातली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारसभा घेतल्या. या सभांमधून ठाकरेंनी महायुती सरकारविरोधात टीका केली. आजपासून राज्यातील प्रचारसभा थांबणार आहेत, २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतदानापूर्वी एक व्हिडीओ संदेश शेअर केला आहे.
उद्धव ठाकरेंचा मतदारांना खास संदेश
"आज मी आपल्याकडे न्याय मागायला आलो आहे. गेल्या अडीच वर्षापूर्वी आपलं सरकार चाललं होतं, ते कोणत्या पद्धतीने पाडण्यात आले. अडीच वर्षे झालीत आपण न्याय मागत आहे, पण अजूनही न्याय मिळत नाही. न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल तर मी आता आपल्या न्यायालयात न्याय मागायला आलो आहे. दिवसाढवळ्या यांनी आपला पक्ष चोरला. हे सगळं चोरलं तरी देखील आपल्या आशिर्वादामुळेच मी ठाम उभा आहे. या लोकांनी सगळं चोरलं असलं तरी आपलं प्रेम ते चोरु शकलेले नाहीत, असंही ठाकरे म्हणाले.
"तुमचा विश्वास आणि प्रेम या एकाच गोष्टीवरती मी बेबंदशाहीविरुद्ध लोकशाहीची लढाई लढत आहे. त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजे आहेत. ही लढाई मला काही हव आहे म्हणून नाही, या देशातील नोकशाही टीकवण्यासाठी मला तुमची सोबत हवी आहे. या लढाईमध्ये केवळ माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्राला लुटायचं काम सुरु आहे, आपण ते आपल्या डोळ्यादेखत होऊ द्यायचे का? हे मला तरी नाही पटल, म्हणून आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह उतरा. आपण तिथे असाल तिथे जिद्दीने मतदानासाठी उतरलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरेंनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.