Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल औसा दौऱ्यावर होते, यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केल्याचे समोर आले होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरचे उड्डाणही थांबवले होते. दरम्यान, आज पुन्हा महाराष्ट्र- गोवा सीमेवर त्यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे.
सलग दोन दिवस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान, आज ठाकरे यांची कार महाराष्ट्र -गोव सीमेवर अडवल्याचे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. बॅगा तपासल्यानंतर आयोगाच्या अधिकाऱ्यांवर संतापले होते. तर फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जात आहेत का? असा सवाल केला.
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
दरम्यान, आज बुधवार उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. ठाकरे गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवर इन्सुली चेक पोस्टवर उद्धव ठाकरे यांच्या गाडीची पुन्हा तपासणी करण्यात आली. ठाकरे गोवा विमानतळावर उतरुन कारने सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करत असताना इन्सुली चेक पोस्टवर त्यांची कार अडवली, यावेळी त्यांची गाडी ज्या अधिकाऱ्यांनी अडवली ते अधिकारी काही वेळातच गायब झाल्याची माहिती समोर आली. यावेळी उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले.
अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची तपासणी
काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यानंतर ठाकरे यांनी फक्त विरोधी पक्षांतील नेत्यांच्याच बॅगांची तपासणी सुरू असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही बॅगांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरची बारामती येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी अजित पवार उपस्थित होते, यावेळी अधिकाऱ्यांनी बॅगांची तपासणी केली, यावेळी बॅगांमध्ये चकल्या मिळाल्याचे दिसत आहे, दरम्यान अजित पवार अधिकाऱ्यांना 'खा बाबा खा' सांगत असल्याचे दिसत आहे, तर दुसरा डबाही तपासण्यासाठी देत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.