मुंबई : विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात ६५ टक्के मतदान झाले. मागील निवडणुकीपेक्षा हे मतदान जास्त झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे जादा झालेले मतदान कोणाच्या पारड्यात गेले आणि ते कोणाला धक्का देणारे ठरेल हे शनिवारी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होईल. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ६२.८९% मतदान झाले.
राज्यभरात सकाळपासूनच मतदानाचा जोर दिसून आला. अनेक ठिकाणी मतदानातील गोंधळाच्या किरकोळ घटना घडल्या. मुंबई, मुंबई उपनगर, बीड, नाशिक, बारामती, धुळे, नागपूर येथे मारामारी, धक्काबुक्की, मतदान प्रक्रियेत खोडा, दोन गटांत संघर्ष, बाचाबाची अशा वेगवेगळ्या घटना घडल्या. या घटना वगळता सर्वत्र मतदान सुरळीत पार पडले.
लोकसभा निवडणुकीत कमी मतदान केंद्रामुळे झालेला गोंधळ आणि मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी यावेळी राज्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे जास्त काळ मतदारांना रांगेत उभे राहावे लागल्याच्या तक्रारी यावेळी आल्या नाहीत. दुपारी तीन वाजेनंतर मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले.
गडचिरोली : ७३ टक्के
नक्षलप्रभावित गडचिरोलीत लोकशाही नाकारू पाहणाऱ्या नक्षलवाद्यांच्या बुलेटला मतदारांनी बॅलेटद्वारे उत्तर देत मोठ्या जोमाने मतदानाचा हक्क बजावून चोख उत्तर दिले. जिल्ह्यात अंदाजे ७३ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.
नागपुरात राडा; काँग्रेस कार्यकर्त्यांचा ईव्हीएम असलेल्या कारवरच हल्ला
नागपूर : दिवसभर काही ना काही कारणाने तणावात असलेल्या नागपूर मध्य मतदारसंघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चक्क अतिरिक्त ईव्हीएम मशीन असलेल्या निवडणूक आयोगाच्या कारवरच काही तरुणांनी हल्ला केला. संबंधित कारची तोडफोड करण्यात आली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिस विभागाकडून हल्ला करणारे तरुण काँग्रेस कार्यकर्ते होते व गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदान केंद्रावर उमेदवाराचा मृत्यू
बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब नारायण शिंदे (४०) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मतदान केंद्रावर मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १:३० च्या सुमारास घडली.
कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान?
मुंबई शहर ५२.०७%, ठाणे ५६.०५%, मुंबई उपनगर ५५.७७ %, पालघर ६५.९५%, पालघर ६५.९५%, अमरावती ६५.५७%, रायगड ६५.९७%, छ. संभाजीनगर ६८.०३%, गडचिरोली ७३.६८%, जालना ७२.३०%, नांदेड ६४.९२%, पुणे ६०.७०%, वर्धा ६८.३०%, बीड ६५.७१%, गोंदिया ६९.५३%, कोल्हापूर ७६.२५%, नंदुरबार ६९.१५%, सिंधुदुर्ग ६८.४०%, वाशिम ६६.०१%, भंडारा ६९.४२%, हिंगोली ७१.७०%, लातूर ६६.९२%, नाशिक ६७.५७%, रत्नागिरी ६४.६५%, यवतमाळ ६९.०२%, बुलढाणा ७०.३२%, अहिल्यानगर ७१.७३%, अकोला ६२.२३%, धाराशिव ६४.२७%, सांगली ७१.७९%, परभणी ७०.३८%, चंद्रपूर ७१.२७%, जळगाव ६४.४२%, नागपूर ६०.४९%, सोलापूर ६७.३६%, सातारा ७१.७१%, धुळे ६४.७०%.