Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभेच्या रणधुमाळी सुरुवात झाली आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरुच आहे. शिवसेना ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत सांगोला विधानसभा मतदारसंघात आणि रामटेक विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे. या दोन्ही जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले नसल्याचे दिसत आहे. सांगोला मतदारसंघावर शेकाप पक्षाने दावा केला आहे. दरम्यान, आता या जागेत पुन्हा बदल होऊ शकतो, अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आता या जागेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या जागेत बदल होऊ शकतात असं सांगितलं आहे.
आज पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही जागेबाबत पेच नसल्याचे म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले,शिवसेनेत कुठेही बंडखोरी होणार नाही. आताच्या यादीत दुरुस्त होऊ शकते, एखाद्या नावात किंवा जागेत बदल होऊ शकतो. कोणत्याही जागेवर पेच नाही, रामटेक विधानसभा मतदारसंघात आणि सांगोला मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे तिथे आम्ही निर्णय घेणार आहे, तिथे काय करायचे ते ठरवणार आहे, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.
"अजून दोन, तीन दिवस आहेत, काही जागांवर आमचे एकमत झाले आहे. आज आम्ही घटक पक्षांसोबत बैठक घेणार आहे. सोमवार पर्यंत आमचं पूर्ण होईल, असंही संजय राऊत म्हणाले. आमच्या शिवसेनेला कधी दिल्लीला जायला लागले नाही, पण आता या शिवसेनेला दिल्लीला अमित शाह यांच्या घरी बैठकीसाठी जायला लागते, असा टोलाही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.