महाराष्ट्रातील नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून महायुतीत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच असताना एनडीएचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे, त्यांना केंद्रात आणा. जर ते ऐकलेच नाहीत तर भाजपाने शिवसेनेला बाजुला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावे असे म्हटले आहे. शिंदेंनी अडीच वर्षे चांगले काम केले आहे. यामुळे त्यांनी केंद्रात यावे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे, असे आठवले म्हणाले आहेत.
शिंदेंनी फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस झाले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे ठरत नाहीय. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला मुख्यमंत्री पद हवे आहे. फडणवीस यांच्या नावावर अजित पवारांची देखील संमती आहे. परंतू तिकडे शिंदे शिवसेनेत कुरबुर सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात चांगल्या योजना आल्या, मोठे यश मिळाले. यामुळे महायुती एवढे चांगली कामगिरी करू शकली आहे. यामुळे शिंदेंनाच मुख्यमंत्री करावे असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.