मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार? आचारसंहिता कधी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहातील मंत्रिमंडळ बैठक सभागृहात होत आहे. आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही विद्यमान महायुती सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची दाट शक्यता आहे. यानंतर विधानसभेची आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते.
उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. आज पुन्हा सकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहेत.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक १० ऑक्टोबर रोजी पार पडली होती. या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक शेवटची असेल, असे म्हटले जात होते. पण, आज पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर २४ तासांमध्ये आचारसंहिता लागणार असल्याची माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत २६ नोव्हेंबर पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. तसेच, आचारसंहितेचा कालावधी ३० दिवसांचा असल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. राज्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया निकालांसह पूर्ण करावी लागणार आहे.