Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. महायुतीने पुन्हा एकद एकहाती सत्ता मिळवली. २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळविला. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीआधी राज्यात खासदार शरद पवार यांच्या पक्षात भाजपातील नेत्यांनीही प्रवेश केला.
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
विधानसभा निवडणुकीआधी भाजपामधून कागलचे समरजीत घाटगे, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, बेलापूरमधील संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या तिनही नेत्यांना खासदार शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले.
हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात पाटील यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना ११७२३६ एवढी मत मिळाली. तर हर्षवर्धन पाटील यांना ९७८२६ एवढी मत मिळाली. अजित पवार गटातील दत्तात्रय भरणे यांनी १९४१० मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला.
समरजीत घाटगे
समरजीत घाटने यांनीही विधानसभा निवडणुकीआधीच भाजपातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. खासदार शरद पवार यांनी त्यांना विधानसभेच्या मैदानात उतरवले. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांनी निवडणूक लढवली. मुश्रीफ यांना १४५२६९ एवढी मत मिळाली, तर घाटगे यांना १३३६८८ एवढी मत मिळाली. मुश्रीफ यांनी ११५८१ मतांची आघाडी घेत विजय मिळवला.
संदीप नाईक
बेलापूरमध्ये अर्ज दाखल करण्याच्या आधी मोठी राजकीय घडमोड झाली. भाजपातून संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प्रवेश केला. संदीप नाईक यांनी भाजपाच्या मंदा म्हात्रे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत संदीप नाईक यांचा निसटता पराभव झाला आहे. भाजपाच्या मंदा म्हात्रे यांना ९१८५२ एवढी मत मिळाली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार ९१४७५ एवढी मत मिळाली. मंदा म्हात्रे यांनी ३७७ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला.
शरद पवार गटाला केवळ १० जागांवर
महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे. काँग्रेस १६, उद्धवसेनेला २० तर शरद पवार गटाला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले आहे. तिन्ही पक्षांचे मिळून राज्याचा गतिमान विकास करणारे सरकार आम्ही देऊ, अशी ग्वाही महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राला दिली आहे.