कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 10:53 AM2024-11-24T10:53:58+5:302024-11-24T10:55:44+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : Who won by 162 votes and who won by 208 votes; A tough fight was seen on 'these' seats! | कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :  मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे नवीन सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमताने सत्ता राखली आहे. दरम्यान, काहीजण या निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक मानत आहेत. विधानसभेच्या २८८ पैकी २३५ जागा जिंकत महायुतीने प्रचंड बहुमताने विजय मिळविला. भाजपने १३२, शिंदेसेनेने ५७, तर अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. तसेच, महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षी शाहू आघाडी १ व रासपच्या एका जागेचा समावेश आहे. 

महाविकास आघाडीबद्दल बोलायचे झाले तर, महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक १०२ जागा लढवल्या, पण त्यांना केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात अशा काही गोष्टी घडल्या की, जर मताधिक्य थोडे कमी झाले असते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची साकोलीची जागा गमवावी लागली असती. त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे आणि शरद पवार गटाचे आणि इतर पक्षांचे काही विजयी आमदारही निवडणुकीत पराभूत झाले असते.

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार अल्प मतांनी विजयी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार १६२ मतांनी विजयी झाले, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून २०८ मतांनी विजयी झाले आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघात एआयएमआयएमचे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी 'भारतीय सेक्युलर लार्जेस्ट असेंबली ऑफ महाराष्ट्र'चे उमेदवार आसिफ शेख रशीद यांचा १६२ मतांनी पराभव केला.

या जागांवरही फासे पलटले असते
भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा २०८ मतांनी पराभव केला. नवी मुंबईतील बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे अवघ्या ३७७ मतांनी विजयी झाल्या. बुलढाणामधून शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड ८४१ मतांनी विजयी झाले. कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी १२४३ मतांनी आपली जागा राखली.

मंत्रीही अल्पमतात विजयी झाले
राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून १५२३ मतांनी विजयी झाले. महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत परंडा मतदारसंघातून १५०९ मतांनी विजयी झाले. महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे उमेदवार अतुल सावे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून २१६१ मतांनी विजयी झाले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : Who won by 162 votes and who won by 208 votes; A tough fight was seen on 'these' seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.