Chandrashekhar Bawankule, BJP Maharashtra: "महाविकास आघाडी सरकार राज्यात आले, तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील. राज्यात महायुतीचे सरकार आले तर विकासाचे इंजिन धावणार आहे हे साऱ्यांनी जनतेला सांगावे. जिद्दीने संघर्ष करण्याचा आपला पिंड आहे. त्यामुळे आपण बूथ यंत्रणा मजबूत करून प्रत्येकाने नवे दहा मतदार मिळवण्यासाठी काम करायचे आहे. तसे झाले तर विधानसभा निवडणुकीत महायुती दोनशे पार होईल," असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी व्यक्त केला. पुण्यात प्रदेश भाजपाच्या अधिवेशनात बावनकुळे बोलत होते. यावेळी राज्याचे प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, सह प्रभारी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
"देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या परिश्रमाने मराठा आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा तयार केला, मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच आहेत. उद्धव ठाकरे सरकारने मोदी सरकारच्या १८ योजना बंद पाडल्या. ओबीसी समाजाचे परत गेलेले आरक्षण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आणले. महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवण्याचे पाप केले," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षातील नेतेमंडळी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षात नाराजीनाट्य सुरु असल्याच्या चर्चा आहे. अशा वेळी पक्षाकडून काय मिळेल याचा विचार न करता आगामी दोन-तीन महिन्यात नेतृत्वावर श्रद्धा ठेवून काम करा आणि प्रत्येक बूथवर नवीन मतदार नोंदवा, असे आवाहन बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले.