Congress vs BJP: सत्ताधारी पक्षाकडून 'फेक नरेटिव्ह' पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटी सेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहेत. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधाऱ्यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घातला जावा, यासाठी काँग्रेस 'अँक्शन मोड'मध्ये आली आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार 'फेक नरेटिव्ह' हाणून पाडण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने १५ नेते आणि प्रवक्त्यांच्या टीमकडे दिली आहे.
काँग्रेसची 'ती' १५ नेतेमंडळी कोण?
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अॅड. यशोमती ठाकूर, अमित देशमुख , डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरण सिंग सप्रा या १५ जणांचा या टीममध्ये समावेश आहे.
काँग्रेसचा 'प्लॅन' काय?
काँग्रेस पक्षातील अनुभवी आणि ज्येष्ठ अशा १५ नेते व प्रवक्ते मंडळी यांना भाजपाशी दोन हात करण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे. ही सर्व मंडळी पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमांशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाणार आहेत. भाजपाच्या आय टी सेल कडून सातत्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळींबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत असून फेक न्यूज आणि फेक नरेटिव्ह तयार केले जात असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्याच संदर्भात झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार हा प्लॅन तयार करण्यात आला आहे.