मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासह सर्व सत्तापदांचं समान वाटप करण्याची मागणी लावून धरली. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्यानं भाजपाकडून इतर मार्गांचा वापर केला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे.शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा दावा रवी राणा यांनी केला. 'गेल्या 5 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं. त्यांनी राज्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. त्यामुळे पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासह आज राज्यपालांची भेट घेतली. बडनेराचे आमदार असलेल्या रवी राणा यांनी निकालानंतर लगेचच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाठिंब्याचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. मात्र भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपाचं संख्याबळ 118 ते 120 च्या घरात पोहोचलं आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; आमदाराचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 12:53 PM