मुंबई: विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्यानं मुख्यमंत्रिपदाबद्दल 'प्रचंड आशावादी' असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक 'अवजड' आणि 'अवघड' अट ठेवल्याचं समजतं. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आल्याचं पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं वृत्त 'मुंबई मिरर'नं प्रसिद्ध केलं आहे.विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र भाजपापासून लांब राहण्याबद्दलच्या निर्णयावर शिवसेना कितपत गंभीर आहे, हे राष्ट्रवादीला पाहायचं आहे. त्यामुळेच शिवसेनेनं भाजपासोबत असलेले त्यांचे केंद्रापासूनचे संबंध संपुष्टात आणावेत, अशी अट राष्ट्रवादीनं ठेवली आहे.'राष्ट्रवादीशी आघाडी करून काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन करू असा दावा शिवसेना करते. हे समीकरण त्यांना खरोखरच जुळवून आणायचं असेल, तर त्यांनी केंद्रातलं मंत्रिपद सोडावं. त्यांनी असं पाऊल उचललं तरच ते गंभीर असल्याचं आम्हाला समजेल. शिवसेना हा निर्णय घेणार नसेल, तर मग यात काही अर्थ नाही,' असं राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलं. शिवसेना केंद्रातलं मंत्रिपददेखील राखणार आणि राज्यात आम्ही राज्यात त्यांना पाठिंबा द्यावा ही अपेक्षादेखील ठेवणार. असं कसं चालेल?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी मे महिन्यात केंद्रात अवजड उद्योग मंत्रालयाची धुरा स्वीकारली. त्याआधी मोदी-1 मध्येही हे मंत्रालय शिवसेनेकडेच होतं. शिवसेना खासदार अनंत गीते यांच्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी होती. मात्र यंदा गीते पराभूत झाले. त्यानंतर सावंत यांनी अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. सावंत यांनी लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा पराभव केला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात साथ देऊ, पण...; राष्ट्रवादीची शिवसेनेसमोर 'अवजड' अट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 9:48 AM