मुंबई: विधानसभेचा निकाल लागून आठवडा होत आला तरी शिवसेना, भाजपाला सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावं असा शिवसेनेचा आग्रह आहे. यासाठी शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेचा दाखला दिला आहे. मात्र त्यावेळी भाजपानं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणताही शब्द दिला नव्हता, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं म्हणत फडणवीस यांनी भाजपाची भूमिका स्वच्छपणे मांडली आहे. यानंतर आता भाजपानं शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे.मुख्यमंत्रिपद मिळणार नाही. पण उपमुख्यमंत्रिपदाबद्दल चर्चा होऊ शकते, असं भाजपानं नव्या प्रस्तावात म्हटलं आहे. भाजपानं शिवसेनेला 13-26 चा फॉर्म्युला दिला आहे. यानुसार शिवसेनेला एकूण 13 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात. तर भाजपा 26 मंत्रिपदं स्वत:कडे ठेऊ शकते. चार महत्त्वाची मंत्रिपदं शिवसेनेला देण्याची भाजपाची तयारी नाही. महसूल, नगरविकास, गृह, अर्थ मंत्रालयं भाजपा आपल्याकडेच ठेवेल.उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास त्यावर लगेच आदित्य ठाकरेंची वर्णी लावू नये, असा मोठा मतप्रवाह पक्षात आहे. त्याऐवजी ज्येष्ठत्वाचा मान राखत सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे यांना संधी द्यावी असा विचार आहे. त्यातही देसाई यांना सुरूवातीचे दोन-अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपद द्यावं आणि नंतर ते आदित्य यांच्याकडे सोपवावं. देसाईंना सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपद दिलं तर अडीच वर्षांनंतर ते सोडताना फारशी खळखळ होणार नाही. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिले आणि नंतर त्यांच्याऐवजी आदित्य यांना आणल्यास राजी-नाराजीचे सूर उमटू शकतात हे लक्षात घेता देसाई यांना संधी दिली जाऊ शकते. तानाजी सावंत यांना शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं मंत्रिपद मिळालं आणि नंतर ते मातोश्रीच्या ज्या पद्धतीनं ते निकट गेले, त्यावरून त्यांचे नावही चर्चेत आहे. आदित्य यांना लगेच उपमुख्यमंत्री करण्याऐवजी त्यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाऊ शकते.
महाराष्ट्र निवडणूक 2019: 13 दुणे 'स्पेशल 26'... भाजपाकडून शिवसेनेला मंत्रिपदांचा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 15:34 IST