मुंबई: राज्यातलं महायुतीचं सरकार कायम राहणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. अब की बार महायुती 200 पार अशी घोषणा सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आली होती. मात्र सध्याच्या घडीला महायुती 160 च्या आसपास जागा जिंकताना दिसत आहे. भाजपा आणि शिवसेनेला गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळतील, अशी परिस्थिती आहे. मात्र भाजपाची कामगिरी चांगली झाली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी स्ट्राइक रेटचा संदर्भ दिला. विधानसभा निवडणुकीचा स्पष्ट होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना भाजपाच्या कमी झालेल्या जागांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही आकडे सांगितले. 'गेल्या निवडणुकीत आम्ही 260 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी आम्ही 122 जागांवर विजय मिळवला. आमचा स्ट्राइक रेट 46 टक्के होता. यंदा आम्ही 164 जागा लढवून जवळपास 105 जागा जिंकत आहोत. म्हणजेच आमचा स्ट्राइक रेट 70 च्या घरात गेला आहे,' असं मुख्यमंत्री म्हणाले.भाजपाची कामगिरी चांगली झाल्याचा दावा करताना मुख्यमंत्र्यांनी पक्षाला झालेल्या मतदानाची टक्केवारीदेखील सांगितली. पाच वर्षांपूर्वी आम्ही 260 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी आम्हाला 28 टक्के मतं मिळाली होती. मात्र यंदा 164 जागा लढवूनही आम्हाला 26 ते 26.50 टक्के मतं मिळाली आहेत, अशी आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी पराभूत झालेल्या भाजपा मंत्र्यांवरदेखील भाष्य केलं. आजचा दिवस विजयाचा आहे. उद्या पराभूत झालेल्या जागांवरील कारणांचा आढावा घेऊ. पंकजा मुंडेंचा पराभव आमच्यासाठी धक्कादायक आहे. त्यांच्या मतदारसंघात पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. मात्र तरीही निकाल विरोधात गेलाहे. त्याची कारणमिमांसा केली जाईल, असं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र निवडणूक 2019: जागा कमी झाल्या, तरी स्ट्राइक रेट भारी; मुख्यमंत्र्यांनी दिली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 5:13 PM