मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत एक्झिट पोलचे आकडे फोल ठरवित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अनपेक्षित यश मिळविलं आहे. राज्यात सत्ता महायुतीची असली तरी महाआघाडीला प्रचंड यश मिळालं आहे.
काँग्रेसला ४३ तर राष्ट्रवादीला ५५ जागांची आघाडी मिळाली आहे. तर महायुतीत भाजपाला १०२ तर शिवसेना ६० जागांवर आघाडी आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, महायुतीचं २२० पार जे सुरु होतं ते लोकांनी स्वीकारलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी पेक्षा जास्त जागा जिंकल्या, विरोधी पक्षांनी एकजुटीने काम केलं. सत्तेचा उन्माद लोकांना आवडलं नाही, प्रचारात किती टोकाची मते मांडावी याबद्दलची सीमा पार केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असं पवारांनी सांगितले.
तसेच पक्षांतर करणाऱ्यांपैकी काही अपवाद सोडले तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांबद्दल जनतेने नकारात्मक भूमिका घेतली. साताराकरांचे विशेष आभार मानतो, साताराला जाऊन श्रीनिवास पाटील आणि तेथील जनतेचे आभार मानणार आहे. सातारच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव झाला असा टोला शरद पवारांनी उदयनराजेंना लगावला आहे.
तर राज्यात नवीन नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न पक्षाने केला, तो आणखी व्यापक पद्धतीने करावा यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य पातळीवर जाऊन ठिकठिकाणी पक्षाचं नवीन नेतृत्व तयार करणार आहे असं शरद पवारांनी सांगत सत्ता जाते, सत्ता येते पण पाय जमिनीवर ठेवावे लागतात असा चिमटा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना काढला आहे.