लातूर - मराठवाड्यात लक्ष लागलेल्या लातूरमधील लढतीत काँग्रेसच्या दोन्ही उमेदवार बंधूंचा विजय झाला आहे. लातूरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना विजय मिळाला आहे. अमित देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर असून त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे. तर धीरज देशमुख 1 लाख 19 हजार 826 एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. अमित देशमुख यांनी भाजपाच्या शैलेश लाहोटी तर धीरज देशमुख यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला आहे.
आपल्या दोन्ही बंधुंच्या विजयासाठी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख या जोडीने आपल्या लातूर जिल्ह्यात तळ ठोकला होता. तसेच, माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख, वैशाली विलासराव देशमुख, लातुर शहर विधानसभेचे उमेदवार माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख, अदिती देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, लातुर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख, दिपशिखा देशमुख यांनीही प्रचारात मोठा सहभाग घेतला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर मतदार संघातून तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख निवडणूक लढवली. याआधी विलासराव आणि त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख सोबतच आमदार होते. त्यामुळे या दोघांनाही आमदार होऊन देशमुख कुटुंबातील दोन भाऊ आमदार असण्याची परंपरा कायम राखण्याची संधी मिळाली आहे.