मुंबई: राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे. भाजपा, शिवसेनेच्या जागा कमी होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दुहेरी धक्का बसला आहे. अब की बार 200 पारची घोषणा देणाऱ्या महायुतीला पावणे दोनशेचा आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे. त्यातच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या पाच सहकाऱ्यांचा पराभव झाला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचे मंत्री राम शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला. जलसंवर्धन मंत्री असलेल्या शिंदेंना राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी धक्का दिला. रोहित पवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना परळीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंनी पंकजा यांना जवळपास 20 हजार मतांनी पराभूत केलं. मुंडे बंधू भगिनींमधल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपा नेते आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांचादेखील पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या सुनिल शेळकेंनी भेगडेंना धक्का दिला आहे. भाजपासोबतचे शिवसेनेच्या मंत्र्यांनादेखील मतदारांनी घरचा नारळ दाखवला आहे. शिवसेना नेते विजय शिवतारेंना पुरंदरमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी त्यांचा पराभव केला. जालन्यात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकरांना पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी त्यांचा पराभव केला आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकालः फडणवीसांना धक्का; महायुतीच्या पाच मंत्र्यांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 3:03 PM