मुंबई: विधानसभेच्या निकालाला नऊ दिवस होऊन गेले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा काही सुटताना दिसत नाही. नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका, चर्चा जोरात सुरू आहेत. मात्र तरीही सत्ता स्थापनेचा पेच काही सुटलेला नाही. विशेष म्हणजे राज्यातील मतदारांनी महायुतीला अगदी स्पष्ट कौल दिलेला असतानाही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. शिवसेनेनं वारंवार 50-50 चा आग्रह धरला आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपामध्ये सत्ता स्थापनेबद्दल चर्चादेखील होताना दिसत नाही. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी शिवसेनेला टोला लगावला आहे. सत्तापदांचं समान वाटप व्हावं अशी मागणी करत शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं अशी आग्रही भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्यावरून ओवेसींनी शिवसेनेला चिमटा काढला. हे फिफ्टी-फिफ्टी काय आहे? हे काय नवं बिस्कीट आहे का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: 'काय फिफ्टी-फिफ्टी लावलंय? सत्ता म्हणजे बिस्कीट आहे का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 9:09 AM