महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : मुख्यमंत्र्यांना मताधिक्य कमीच, अजित पवारांना सर्वोच्च लीड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 09:56 PM2019-10-24T21:56:42+5:302019-10-24T22:07:20+5:30
Maharashtra Election Result 2019: काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांनीही जवळपास 1 लाख 62 हजार मतांनी विजय मिळवला आहे.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून विजय मिळवत आपला गड राखला आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळालेलं मताधिक्य हे विचार करायला लावणार आहे. मुख्यमंत्र्यांचे विरोधक काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांना 58774 मते मिळाली आहेत. तर, फडणवीस यांना 1 लाख 8 हजार 256 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा भाजपाच्या विरोधी पक्षातील नेत्यांना अधिक मताधिक्य मिळालंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 49 हजार 482 मतांनी विजय मिळवता आला आहे. 49482 मताधिक्य फडणवीस यांना आपल्या मतदारसंघातून मिळालंय. तर काँग्रेस उमेदवार आशिष देशमुखांना 58774 मते मिळाली आहेत. मात्र, फडणवीस यांच्यापेक्षा विरोधी पक्षातील नेते अजित पवार, काँग्रेस नेते धीरज देशमुख, विश्वजीत कदम, अशोक चव्हण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आणि जितेंद्र आव्हाड या उमेदवारांनी अधिक मताधिक्य मिळवत विजय खेचून आणलाय. ..
बारामती मतदारसंघातून अजित पवारांना 1 लाख 95 हजार 641 मतं मिळाली आहेत. अजित पवारांचे विरोधी उमेदवार गोपीचंद पडळकर यांना फक्त 30 हजार 376 मतं मिळाली आहेत. त्यामुळे अजित पवारांना तब्बल 1 लाख 65 हजार 265 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे.
काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांनीही जवळपास 1 लाख 62 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर, लातूर ग्रामीणमधून काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनीही 1 लाख 20 हजारांचं मताधिक्य घेतलंय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही लाखाच्या घरात पोहोचत 97 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जवळपास 82 हजारांचं मताधिक्य घेऊन विजय यश मिळवलं. जितेंद्र आव्हाड यांनीही जवळपास 75 हजारांचं मताधिक्य घेतलंय. बाळासाहेब थोरात यांनी 62 हजार तर दिलीप वळसे पाटील यांनी 66 हजारांच्या जवळपास मताधिक्य घेऊन मुख्यमंत्र्याना मताधिक्याच्या लढाईत पिछाडीवर ठेवलं आहे.