कल्याण: लोकसभेवेळी लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपा, शिवसेनाविरोधात प्रचार करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाची धुरा हाती द्या, असं आवाहन मतदारांना केलं. राज ठाकरेंनी त्यांच्या जवळपास सर्वच सभांमध्ये हीच भूमिका मांडली. मनसेनं यंदा विधानसभेच्या 100 हून अधिक जागा लढवल्या आहेत. मात्र सध्या मनसेचं इंजिन केवळ एका मतदारसंघांत आघाडीवर आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांनी २२१० मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी शिवसेनेचे रमेश म्हात्रे पिछाडीवर आहेत. मतमोजणीनंतरच्या जवळच्या सर्वच एक्झिट पोलमधून मनसेची धूळधाण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मतमोजणीच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. कल्याण ग्रामीण वगळता मनसेला इतर कोणत्याही मतदारसंघात आघाडी मिळालेली नाही. कोथरुडमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेच्या किशोर शिंदेंना महाआघाडीनं पाठिंबा दिला होता. त्यांच्यासाठी राज ठाकरेंनीदेखील सभा घेतली होती. मात्र या मतदारसंघात मनसे पिछाडीवर आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकालः मनसेच्या इंजिनात पुन्हा बिघाडी; केवळ एका जागेवर आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 9:34 AM