मुंबई - परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडेंचा विजय झाला. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली आहे. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. विजयानंतर आपल्या कार्यर्त्यांसह धनंजय मुंडेंनी घर गाठलं. त्यावेळी मुंडेंसह त्यांच्या आईंनाही अश्रू अनावर झाले होते. माझा धनु जिकंला, माझा धनु निवडणूक आला म्हणत धनंजय मुंडेंच्या मातोश्रींना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यावेळी, धनंजय मुंडेंनी आईला जादू झप्पी देताना वातावरण अतिशय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला. धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातून विजय मिळवला. धनंजय यांनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतली होती. निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपामुळे परळी मतदारसंघातील लढत राज्यात चर्चेचा विषय बनली होती. धनंजय मुंडेंच्या व्हायरल क्लिपनंतर पंकजा यांना आलेली भोवळ आणि त्यानंतर बदललेलं राजकीय वातावरण परिणामकारक ठरेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, पंकजा यांच्या भावनिक राजकारणाला जनतेनं लाथाडत निवडणुकीत धनंजय मुंडेंना कौल दिला. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना, सत्यमेव जयते असे आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लिहिले. आपल्या विजयानंतर कार्यकर्त्यांच्या गर्दीसह धनंजय मुंडेंनी घरचा रस्ता धरला. अंगावर पडलेला गुलाल, घामानं भिजलेलं शरीर, कपाळी लागलेला विजयी टीळा आणि हजारो कार्यकर्त्यांची फौज घेऊ धनुभाऊ आपल्या आईंच्या दर्शनासाठी, माऊलीच्या आशीर्वादासाठी परळीतील आपल्या निवासस्थानी गेले. त्यावेळी, कित्येकांना आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाहीत. विजयी मिरवणूक घेऊन आलेल्या आपल्या धनंजय मुंडेंना पाहाता, त्यांच्या मातोश्रींनी अश्रूंना वाट मोकळी केली. माझा धनु जिंकला म्हणत आईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यावेळी, हा भावूक क्षण पाहून अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी, धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णांच्या आठवणीही नकळत जागल्या. माय-लेकाच्या भेटीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, आपल्या पराभवानंतर पंकजा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना, 'अनाकलनीय' असं वर्णन केलंय. परळी शहरातून 18 हजारांवर मताधिक्क्य धनंजय मुंडे यांना मिळाले.
परळी मतदार संघातील ग्रामीण भागातून मताधिक्क्य तर मिळालेच परंतु शहरातूनही मताधिक्क्य मिळाल्याने धनंजय मुंडेंचा मोठा विजय झाला. धनंजय मुंडे यांचा प्रत्येक कार्यकर्त्यांशी चांगला संवाद असल्याने व समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून पाच वर्ष काम केल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना यश प्राप्त करता आले. धनंजय मुंडेंनी परळी विधानसभा मतदार संघातील अनेक गावात जाहिर सभा, मतदारांच्या गाठीभेटी घेवून संवाद साधला होता. हा संवादही धनंजय मुंडेंच्या कामाला आला. राष्ट्रवादी काँग़्रेसच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री पंडीतराव दौंड, संजय दौंड व काँग्रेसचे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जीव तोडून मेहनत घेतली. धनंजय मुंडेंची विकासासाठी असलेली तळमळ पाहून मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या पारड्यात मते टाकली. परळी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात विकासाच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले. पंचायत समितीच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात कामे केली. या विकास कामाचीही त्यांना मदत झाली.