मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. शिवसेना, भाजपामध्ये अद्याप सरकार स्थापनेविषयी कोणतीही चर्चा होत नसताना दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याचं दिसत आहे. शिवसेनेची तयारी असल्यास राज्याला पर्यायी सरकार मिळेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष प्रस्ताव दिला.विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही संख्याबळ नसल्यानं त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. यावर भाष्य करताना तशी वेळ येणार नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले. शिवसेनेची तयारी असल्यास आणि त्यांनी आमच्याकडे पाठिंबा मागितल्यास आम्ही हात पुढे करू. त्यामुळे राज्याला पर्यायी सरकार मिळेल, असंदेखील मलिक यांनी पुढे म्हटलं. तत्पूर्वी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. त्यानंतर राज्यात 1995च्या फॉर्म्युलाप्रमाणे सत्ता स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, असं या नेत्यानं सांगितलं. शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडल्यावरच याप्रकारे सत्ता स्थापन होईल, असंदेखील हा नेता पुढे म्हणाला.शिवसेना, भाजपानं 1995 मध्ये जो फॉर्म्युला वापरला होता, त्याच फॉर्म्युल्यानुसार आम्ही प्रस्ताव दिल्याचंदेखील राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितलं. '1995 मध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, तर भाजपाकडे उपमुख्यमंत्रीपद होतं. त्याच धर्तीवर आम्ही प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार शिवसेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री होईल,' अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्यानं प्रस्ताव उलगडून सांगितला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तर राज्यात पर्यायी सरकार; राष्ट्रवादीचा शिवसेनेला अप्रत्यक्ष प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 2:39 PM