महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 01:23 PM2019-11-04T13:23:03+5:302019-11-04T13:23:47+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सत्ता स्थापनेचा तिढा कायम असल्यानं राज्यात घोडेबाजाराची शक्यता

Maharashtra Vidhan Sabha Result no one will dare to leave party after udayanraje bhosales defeat says congress leader satyajeet tambe | महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उदयनराजे होण्याच्या भीतीनं एकही आमदार फुटणार नाही'

googlenewsNext

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरल्यानं भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम राहिल्यास भाजपाकडून इतर मार्गांचा वापर करून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसं झाल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊ शकतो. भाजपाकडून इतर पक्षांचे आमदार फोडले जाऊ शकतात, अशीदखील चर्चा आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटवरून भाष्य केलं आहे. 

'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही... लोकशाहीचा विजय असो!', असं तांबेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचं सरकार येऊ नये हीच आहे, असंदेखील तांबेंनी पुढे लिहिलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. मात्र भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपाचं संख्याबळ 118 ते 120 च्या घरात पोहोचलं आहे. मात्र तरीही भाजपा बहुमताच्या जवळ जात नाही.



शिवसेनेसोबत सकारात्मक चर्चा न झाल्यास सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी भाजपाला विश्वासदर्शक ठरावा जिंकावा लागेल. यासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच पत्रकार परिषदेत याबद्दलचा आरोप केला जात होता. भाजपाकडून आमदारांवर दबाव आणला जात आहे. गुंडगिरीसह अन्य मार्गांचा वापर भाजपाकडून केला जात आहे. भाजपासारखं राजकारण गुंडांनीदेखील केलं नसेल, अशा कठोर शब्दांत राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं होतं. 

आमदारांच्या फोडोफोडीच्या शक्यतेवर भाष्य करताना सत्यजित तांबेंनी भाजपाचे नेते उदयनराजे भोसलेंच्या पराभवाचा संदर्भ दिला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या उदयनराजेंनी अवघ्या चार महिन्यात राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. 

 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result no one will dare to leave party after udayanraje bhosales defeat says congress leader satyajeet tambe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.