मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटले तरी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरल्यानं भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम राहिल्यास भाजपाकडून इतर मार्गांचा वापर करून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसं झाल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊ शकतो. भाजपाकडून इतर पक्षांचे आमदार फोडले जाऊ शकतात, अशीदखील चर्चा आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटवरून भाष्य केलं आहे. 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालामुळे, उदयनराजे होण्याच्या भितीने एकही आमदार फुटण्याची हिम्मत करु शकत नाही... लोकशाहीचा विजय असो!', असं तांबेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनतेची भावना भाजपाचं सरकार येऊ नये हीच आहे, असंदेखील तांबेंनी पुढे लिहिलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. मात्र भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपाचं संख्याबळ 118 ते 120 च्या घरात पोहोचलं आहे. मात्र तरीही भाजपा बहुमताच्या जवळ जात नाही.