मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झालं आहे. महायुतीची राज्यातली सत्ता कायम राहणार असल्याचं सध्याच्या आकडेवारीवरुन दिसत आहे. यंदाची विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल. आमचे पैलवान तयार आहेत, पण समोर कोणी पैलवानच नाहीत, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहा मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. याशिवाय भाजपाच्या जागादेखील कमी झाल्या आहेत.भाजपा, शिवसेनेच्या अनेक दिग्गजांना निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. याशिवाय निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडणाऱ्या अनेकांनादेखील मतदारांनी दणका दिला. लातूर ग्रामीणमध्ये तर शिवसेनेची अक्षरश: धूळधाण उडाली. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. लातूर ग्रामीणमध्येकाँग्रेसच्या धीरज देशमुख यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. त्यांना तब्बल 67.59 टक्के मतं मिळाली.लातूर ग्रामीणमध्ये 1 लाख 97 हजार इतकं मतदान झालं. त्यापैकी 1 लाख 33 हजार 161 मतं धीरज देशमुख यांना मिळाली. यानंतर नोटाला तब्बल 27 हजार 287 मतं मिळाली. एकूण मतांची आकडेवारी पाहिल्यास नोटाला 13.85 टक्के मतदान झालं. यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराचा क्रमांक लागतो. शिवसेनेच्या रवी देशमुख यांना 13 हजार 335 मतं मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीच्या बळीराम डोने यांच्या पारड्यात 12 हजार 755 मतं पडली.
महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 6:34 PM