मुंबई: शिवसेना आणि भाजपामध्ये सत्ता स्थापनेवरून मोठी चढाओढ सुरू आहे. सत्तेत समान वाटा मिळावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यानुसार अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. तर पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असा पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यामुळे दोन पक्षांमध्ये दबावाचं राजकारण सुरू झालं. या पार्श्वभूमीवर रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शिवसेनेची भूमिका रास्त असली, तरी त्यांनी भाजपाच्या आमदारांची संख्यादेखील विचारात घ्यावी, असा अप्रत्यक्ष सल्ला उद्धव ठाकरेंना दिला. शिवसेना, भाजपाचं बिनसलं आहे. पण तुम्ही ते जास्त बिनसवू नका, असा चिमटा आठवलेंनी उपस्थित पत्रकारांना काढला. भाजपाचे 105 उमेदवार निवडून आले आहेत. काही अपक्ष आमदारांनीदेखील त्यांना पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचे 56 आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला जागेच्या प्रमाणात हक्क मिळायला हवा. मात्र अवास्तव मागणी केली तर त्यांची इच्छा पूर्ण होईल असं वाटत नाही, असं आठवलेंनी म्हटलं. शिवसेना, भाजपाच्या बिघडलेल्या संबंधांवरदेखील आठवलेंनी भाष्य केलं. 'भाजपा, शिवसेनेचं 5 वर्ष फारसं पटलं नाही. मात्र तरीही ते सोबत राहिले. राज्यातल्या जनतेनं महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे फार वेळ न घालवता 2 दिवसांत सरकार स्थापन करायला हवं. शिवसेनेनं आमच्यासोबत राहिलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सकारात्मक भूमिका घेतील, अशी मला आशा आहे. यासाठी माझी काही मदत लागली, उद्धव ठाकरेंकडे निरोप घेऊन जायचं असेल तर त्यासाठी मी तयार आहे', असं आठवले म्हणाले. भाजपा, शिवसेनेनं दोन पावलं मागे जाऊन लवकर सरकार स्थापन करायला हवं. कारण राज्याला सरकारची आवश्यकता आहे. अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती आहे. काही भागांत अद्याप पावसाचा जोर असल्यानं तिथं पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे तिथल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार स्थापन होणं गरजेचं आहे, असं आठवलेंनी पत्रकारांना सांगितलं. सामनाची भूमिका ही शिवसेनेची भूमिका नाही. शिवसेना, भाजपामधला वाद सामनानं वाढवू नये, अशा शब्दांत आठवलेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे सल्ला दिला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं आहे, पण...; रामदास आठवलेंचा दोघांना मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 2:56 PM