महाराष्ट्र निवडणूक 2019: तावडेंच्या 'विनोदी' उपमा; शरद पवार म्हणजे अॅटम बॉम्ब, तर अजित पवार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 16:40 IST2019-10-27T16:39:54+5:302019-10-27T16:40:37+5:30
Maharashtra Election Result 2019: फडणवीस, खडसे, अमित शहांनादेखील विविध फटाक्यांची नावं

महाराष्ट्र निवडणूक 2019: तावडेंच्या 'विनोदी' उपमा; शरद पवार म्हणजे अॅटम बॉम्ब, तर अजित पवार...
मुंबई: सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. राजकीय नेतेदेखील याला अपवाद नाहीत. याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना माजी सांस्कृतिक मंत्री यांनी राज्यातील नेत्यांना विविध फटाक्यांच्या उपमा दिल्या. भाजपानं यंदाच्या निवडणुकीत तावडेंचं तिकीट कापलं. त्यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती पक्षानं दिली होती.
विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं विनोद तावडे शासकीय निवासस्थान सोडून स्वत:च्या घरी परतले. त्यामुळे जवळपास पाच वर्षानंतर तावडे कुटुंबाची दिवाळी त्यांच्या घरी साजरी होत आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना तावडे यांनी विविध नेत्यांना फटाक्यांच्या उपमा दिल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे सुतळी बॉम्बची क्षमता असणारा डांबरी फटाका असल्याचं म्हटलं.
विनोद तावडेंनी माजी मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंना कधीच न विझणाऱ्या आणि ऊर्जा कधीही कमी न होणाऱ्या फटाक्याची उपमा दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणजे सर्वांना सामावून घेणारा पाऊस आहेत. तर भाजपा अध्यक्ष अमित शहा पक्षाला उंचीवर नेणारं रॉकेट असल्याचं तावडे म्हणाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे अॅटम बॉम्ब आहेत. मात्र हा अॅटम बॉम्ब कधी वाजतो, तर कधी वाजत नाही. या निवडणुकीत तो वाजला, असं तावडेंनी म्हटलं. फडणवीस यांना इको फ्रेंडली फटाक्याची उपमा देताना तावडेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास करणारा इको फ्रेंडली फटाका आहे, असं तावडे म्हणाले.