मुंबई: राज्याच्या सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हाती आहे. त्यामुळे त्या कॅनव्हासमध्ये शिवसेना रंग भरेल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये कृषी, शिक्षण क्षेत्रात केलेलं काम अतिशय उल्लेखनीय असून प्रत्येक आमदारानं ते पाहायला हवं, असं सूचक विधानदेखील त्यांनी केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा का, यावर उद्धव ठाकरे भाष्य करतील, असंदेखील ते पुढे म्हणाले. नाशिकमधले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज राष्ट्रवादीला रामराम हाती शिवबंधन बांधलं. यावेळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. निकालानंतर आम्हाला तीन आमदारांनी पाठिंबा दिला आहे. येत्या काही दिवसात हा आकडा आणखी वाढेल, असं राऊत म्हणाले. शिवसेनेसमोर आणखी कोणते पर्याय आहेत, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना 'आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमच्यासमोरचे पर्याय लवकरच समजतील,' असं सूचक विधान त्यांनी केलं.नवनिर्वाचित आमदारांनी बारामतीला भेट देऊन पवारांनी केलेलं काम पाहावं, असं राऊत यांनी म्हटल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. बारामतीत पवारांनी केलेलं कार्य कौतुकास्पद आहे. ते नव्या आमदारांना पाहायला हवं, असं राऊत म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे लवकरच बोलतील, असं शिवसेना खासदारांनी म्हटलं. राज्याचा राजकीय कॅनव्हासमध्ये शिवसेना रंग भरेल. तो ब्रश उद्धव यांच्या हाती आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019: 'राज्याच्या सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती'; शिवसेना प्रचंड आशावादी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 2:14 PM