महाराष्ट्र निवडणूक निकालः अजित पवारांनी 'ती' धमकी खरी करून दाखवली; शिवसेनेला दे धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:39 PM2019-10-24T13:39:24+5:302019-10-24T13:40:03+5:30
Maharashtra Election Result 2019 लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला इशारा खरा ठरला
पुरंदर: राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या मतमोजणीतून जनतेचा कौल स्पष्ट होऊ लागला आहे. भाजपाच्या जागा कमी होत असताना शिवसेनेच्या जागा कायम राहताना दिसत आहेत. मात्र पुरंदरमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारेंना काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धमकी खरी ठरली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी शिवतारे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळी पवार यांनी शिवतारेंना जाहीर धमकी दिली होती. 'यंदा बघतो तू कसा आमदार होतो ते,' अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. 'शिवतारे तर काय पोपटासारखा मीठू मीठू बोलू लागलाय.. अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती.. तुझा आवाका किती.. तू बोलतोय कोणा बरोबर.. तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते.. बघतो मी.. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाय करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही.. आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या.. गप्प बसा गप्प बसा.. पण याचं तर उर भरून आलंय.. त्याला काय करू, काय नाय होतंय... आता 2019ला हा कसा आमदार होतो तेच मी बघणाराय', असं अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान म्हटलं होतं.
पुरंदरमध्ये विजय शिवतारेंचा पराभव झाल्यानं अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला इशारा खरा ठरला आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंचा 30 हजार 820 मतांनी पराभव केला. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विजय शिवतारेंना भरसभेत इशारा देणाऱ्या अजित पवारांनी बारामतीत विजयाच्या दिशेनं दमदार वाटचाल केली आहे. बारामतीत भाजपाच्या गोपीचंद पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं डिपॉजिट जप्त केलं आहे.