महाराष्ट्र निवडणूक निकालः अजित पवारांची 'ती' धमकी खरी ठरणार? शिवसेनेचा 'विजय' धोक्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:19 AM2019-10-24T11:19:42+5:302019-10-24T11:20:03+5:30
Maharashtra Election Result 2019 लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी दिला होता इशारा
मुंबई: राज्यभरात मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपा सध्या पहिल्या क्रमाकांवर आहे. मात्र त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. तर शिवसेनेच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढताना दिसत आहेत. मात्र पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे पिछाडीवर आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी शिवतारे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यावेळी पवार यांनी शिवतारेंना दिलेली धमकी खरी ठरताना दिसत आहे.
पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप 1366 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे नेते विजय शिवतारे पिछाडीवर पडले आहेत. पुरंदर लोकसभेच्या बारामती मतदारसंघात येतो. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे रिंगणात होत्या. त्यावेळी पुरंदरमध्ये मिळणाऱ्या मताधिक्क्यावरुन शिवतारे आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं. त्यावेळी 'विधानसभेला कसा निवडून येतो तेच बघतो', अशा शब्दांत अजित पवारांनी शिवतारेंना इशारा दिला होता. मतमोजणीच्या प्राथमिक टप्प्यांमध्ये पवारांचा हा इशारा खरा ठरताना दिसत आहे.
अजित पवारांविरोधात बारामतीत भाजपानं वंचितमधून आलेल्या गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र पडळकर सध्या तब्बल 50 हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे अजित पवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. शरद पवारांचे राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून आघाडी मिळवली आहे. याठिकाणी भाजपाचे नेते आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे पिछाडीवर आहेत.