मुंबई: मुख्यमंत्रिपदाबद्दल समझौता होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यानं नाराज झालेल्या शिवसेनेनं आता इतर पर्यायांचा गंभीरपणे विचार सुरू केला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतरांच्या मदतीनं बहुमताचा आकडा गाठून शिवसेना स्वत:चा मुख्यमंत्री करू शकेल, याबद्दल पक्ष 'प्रचंड आशावादी' आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना'मधील एका लेखात यावर भाष्य केलं आहे. राज्यात 5 मार्गांनी सत्ता स्थापन होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र यातील 'अटल' मार्गावर त्यांनी विशेष भर दिला आहे.भाजपा विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यावर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) आणि इतरांच्या मदतीनं बहुमताचा आकडा 170 पर्यंत जाईल. शिवसेना स्वत:चा मुख्यमंत्री करू शकेल व सरकार चालवण्याचं साहस त्यांना करावं लागेल. त्यासाठी तीन स्वतंत्र विचारांच्या पक्षांना समान किमान सामंजस्याचा कार्यक्रम तयार करून पुढे जावे लागेल. अटलबिहारी वाजपेयींनी जसं सरकार दिल्लीत चालवलं तसं सगळ्यांना धरून पुढे जावं लागेल. त्यात महाराष्ट्राचं हित आहे, असं राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.विशेष म्हणजे राऊत यांनी त्यांच्या लेखात आणखी चार शक्यता दिल्या आहेत. मात्र त्या यशस्वी होण्याबद्दल त्यांनीच साशंकता व्यक्त केली आहे. यातील पहिली शक्यता म्हणजे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. मात्र त्यांना आणखी 40 आमदारांचा पाठिंबा लागेल. तसं शक्य झाली नाही तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांचं सरकार कोसळेल. सत्ता स्थापनेच्या दुसऱ्या शक्यतेत राऊत यांनी 2014 मधील पॅटर्नचा उल्लेख केला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं भाजपा विश्वासदर्शक ठराव जिंकू शकते. मात्र 2014 सारखी चूक यंदा पवार करणार नाहीत. कारण पवारांना भाजपाविरोधात यश मिळालं आहे. ते भाजपासोबत गेल्यास त्यांच्या यशाची माती होईल, असं राऊत यांनी लिहिलं आहे.भाजपा, शिवसेना नाइलाजास्तव एकत्र येतील, अशी आणखी एक शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र यासाठी भाजपाला शिवसेनेच्या मागण्यांवर विचार करावा लागेल. मुख्यमंत्रिपदाची विभागणी करावी लागेल. मात्र अहंकारामुळे ते शक्य नाही, असं म्हणत राऊत यांनी हा पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ईडी, पोलीस, पैसा, धाक यांचा वापर करून इतर पक्षांचे आमदार फोडून भाजपास सरकार बनवावे लागेल, असा एक पर्याय त्यांनी लेखात नमूद केला आहे. मात्र पक्षांतर करणाऱ्यांची काय अवस्था होते, असं म्हणत राऊत यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना 'अटल' मार्ग धरणार?; सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 12:33 PM