मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आठवडा उलटून गेला तरीही शिवसेना, भाजपामध्ये सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेला संघर्ष कायम आहे. सत्तापदांचं समान वाटप करण्याची मागणी करत शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे शिवसेना, भाजपामध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे शिवसेना, भाजापमधील संघर्ष आणखी किती काळ चालणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.राज्यातल्या अनेक भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक बोलावली. शिवसेनेचे विधानसभेतले गटनेते एकनाथ शिंदे यांचा कॅबिनेटच्या उपसमितीत समावेश होतो. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या भेटीला दांडी मारली. आपण थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचं म्हणत शिंदे औरंगाबादला रवाना झाले. शिवसेना, भाजपामध्ये आठवड्याभरापासून कलगीतुरा सुरू आहे. राज्यात सात दिवसांत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं म्हणत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. यावरुन शिवसेनेनं 'सामना'मधून मुनगंटीवारांवर पलटवार केला. सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं. सामनातील टीकेनंतर सुधीर मुनगंटीवारांनी भित्र्या सशाची गोष्ट सांगत भाजपावर पलटवार केला. 'मला बालभारतीच्या पुस्तकातली एक गोष्ट आठवते. भित्र्या सशाची ती गोष्ट होती. झाडाचं एक पान गळून नेमकं सशाच्या पाठीवर पडतं. तेव्हा त्याला आभाळ कोसळल्यासारखं वाटतं आणि तो सैरावैरा पळू लागतो. बालभारतीमधला हा धडा मला आजही आठवतो. बाकीच्यांना तो आठवतो का ते माहीत नाही,' असं सूचक विधान करत मुनगंटीवारांनी शिवसेनेला लक्ष्य केलं.